पिंपरी, (प्रतिनिधी) – आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी मतदार शपथ जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांनी घेतली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार उमा खापरे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे, पदाधिकारी अभिमान भोसले, महादेव बोत्रे तसेच महिला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अवयव प्रत्यारोपण समन्वयक आरती गोखले यांचे व्याख्यान पार पडले. या व्याख्यानात त्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे अवयव प्रत्यारोपणबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच देहदान आणि अवयवदान यातील फरक उपस्थितांना समजावून सांगितला.
मृत्यु मृत्युच्या कारणांवरुन अवयवदानाची आणि देहदानाची पात्रता ठरवता येते असेही त्यांनी यावेळी सांगितले. याव्यतिरिक्त अवयवदान कोणकोणत्या अवस्थेत करता येते, कोणकोणते अवयव दान करता येतात, अवयवदानाचे प्रमाणपत्र कोठे मिळते, दान देण्यात आलेल्या अवयवांचे वितरण कसे करता येते, अशा विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमासाठी चारूशीला जोशी, अनिता बावीसकर, कविता माने, मिनाक्षी गरूड, मनाली स्वामी, विजया कांबळे, शीतल मोरे, प्रियंका कोंढाळकर, सीमा सुकाळे यांचे विशेष सहकार्य लाभले, त्यांचा आमदार खापरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी यावेळी गीतगायन तसेच विविध पारंपारिक नृत्यांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि कनिष्ठ अभियंता मनाली स्वामी यांनी केले. तर, उपस्थितांचे आभार विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी मानले.