वडेट्टीवारांकडे पुढील पाच वर्षे विरोधी पक्षनेतेपद राहू दे! – मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार

मुंबई (प्रतिनिधी) – कॉंग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांची सोमवारी विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार राजकिय टोलेबाजी केली. वडेट्टीवारांच्या कार्याचे कौतुक करताना विरोधी पक्षनेतेपदाचा जोपर्यत नीट सराव होत नाही तोपर्यंत पुढील दोन-पाच वर्षे आपण या पदावर राहावे आणि उत्तम कार्य करावे, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या वक्तव्यांनी सभागृहात सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्येही हास्यस्फोट झाला.

कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने विरोधीपक्षनेतेपद रिकामे झाले होते. या रिक्त पदासाठी कॉंग्रेसने उपनेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. त्यावेळी वडेट्टीवारांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी राजकिय टोलेबाजी केली.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावरच कॉंग्रेसने त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी दिली आहे. निवडणूक संपली कि कॉंग्रेस दुसऱ्याला संधी देते, पण मला विश्वास आहे कि विरोधी पक्षनेतेपद आता तुमच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसने पुढेही त्यांनाच संधी द्यावी, नाहीतर निवडणूक संपली कि दुसऱ्या कोणाला संधी द्याल असे काही करू नका, माझी तशी विनंती आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

वडेट्टीवार हे एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. मध्यंतरी ते शिवसेनेतून सत्तारूढ कॉंग्रेस पक्षात गेल्याने आंदोलनाची त्यांची सवय सुटली. आता पुन्हा ते सवय लावून घेण्याचा प्रयत्न करताहेत. आवश्‍यक त्या प्रश्नांसाठी आंदोलने ते करतील, असा विश्वास व्यक्त करत सामान्य माणसाचा प्रश्न मांडणारा, आक्रमक नेता याठिकाणी विरोधी पक्षनेतपदी आरूढ झाला आहे.

लोकशाहीमध्ये सत्तारूढ आणि विरोधी पक्ष या दोघांचे महत्त्व मोठे आहे. सत्तारूढ पक्ष ज्यावेळी सरकार चालवत असतो त्यावेळी ते निरंकूश होऊ नये यासाठी विरोधी पक्षाची व्यवस्था देखील महत्वाची असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधी पक्षनेत्यांनी विरोधाला विरोध न करता आणि विरोधी पक्षनेते म्हणून एक रचनात्मक विरोध, धोरणात्मक विरोध याठिकाणी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच विरोधी पक्षनेते म्हणून ज्या चांगल्या सूचना येतील त्याचा मुख्यमंत्री म्हणून निश्‍चित स्विकार केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

फोडाफोडीचे खरे जनक कोण?
वडेट्टीवार यांच्याकडे पुढील पाच वर्षे विरोधी पक्षनेतेपद राहणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच “वडेट्टीवार यांनाही तुमच्याकडे नेऊ नका’असे मध्येच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले. त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजरजबाबी उत्तर देत राष्ट्रवादीची कोंडी केली. या फोडाफोडीच्या राजकारणाचे खरे जनक कोण आहेत, असा सवाल करताच सभागृहात हास्याचा स्फोट झाला. फोडाफोडीची सुरूवात कोणी केली. या कॉलेजचे प्रिन्सिपल, हेडमास्तर कोण आहेत, ते सांगा. आम्हाला त्याच्या आधीचा इतिहास माहितच नाही, आम्ही फार लहान होतो, असे मुख्यमंत्री म्हणताच राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये शांतता पसरली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×