शिक्रापूर -करंदी (ता. शिरूर) येथील काही भागामध्ये नागरिकांना तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. आता बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात कुत्र्याच्या तोंडाला आणि पायाला दुखापत झाली आहे. नागरिक, शेतकरी भयभीत झाले आहेत.
करंदी येथे गुरुवारी सायंकाळी मुखई रोडजवळील शेतकरी सूर्यकांत दरेकर हे घराजवळ काम करीत होते. त्यांना कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी पाहिले असताना बिबट्या कुत्र्याला ओढून घेऊन जाताना दिसले.
यावेळी दरेकर यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने शेजारील शिवारात धूम ठोकली. करंदी परिसरात उसाचे क्षेत्र जास्त आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांनी केली आहे.
करंदी येथील काही भागामध्ये नागरिकांना तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. आमच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यास सांगितले आहे. त्यांनी पाहणी केल्यानंतर योग्य कार्यवाही केली जाईल.
– मनोहर म्हसेकर,
वनपरिक्षेत्र अधिकारी. शिरूर