मुंबई – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उषा मंगेशकर यांनी दिली आहे. उषा मंगेशकर म्हणाल्या, दीदींची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्या लोकांसोबत बोलू शकतात. पण डॉक्टरांनी त्यांना बोलणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत. ब्रीच कॅंडी रुग्णालयाचे डॉ. प्रतित समदानी म्हणाले, लता मंगेशकर सध्या आयसीयूमध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
खबरदारी म्हणून लता मंगेशकर यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असले तरी त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना पुढील 7 ते 8 दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे. लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे.