रांजणगाव गणपती – कारेगाव (ता. शिरुर) येथे २०१८ ते २०२१ या कालावधीत मेहमूद फारुख शेख हा डॉ. महेश पाटील असे खोटे नाव वापरुन श्री. मोरया हॉस्पिटल, या नावाने हॉस्पिटल सुरु केले होते. आरोपी शेख हा १२ अनुत्तीर्ण असताना तसेच त्याचे कोणत्याही प्रकारचे शिक्षण झालेले नसताना व त्याच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना देखील त्याने एमबीबीएस पदवीचे बनावट सर्टिफिकेट तयार करुन त्याआधारे डॉ. महेश पाटील या बनावट नावाने श्री मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आयसीयू हे चालवून हॉस्पिटलमध्ये पेशंटवर औषोधोपचार केले होते. कोवीड काळामध्ये त्याने औषोधोपचार केलेल्या रुग्णांपैकी एकूण ७ रुग्ण कोवीडमध्ये मयत झालेल्या होते.
याबाबत डॉ. शितलकुमार राम पाडवी (रा. गार्डन व्हिला, नवापूर, जि. नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरुन रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला बोगस डॉ. मेहमूद फारुख शेख याच्याविरुध्द गुन्हा (दि.२२) एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता. तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी तसेच हवालदार विलास आंबेकर यांनी करून आरोपीविरुध्द प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सुनावणीत पुराव्याचे आधारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. सोनकांबळे यांनी दि.२५ डिसेंबर रोजी आरोपी मेहमूद फारुख शेख (रा. पीर बुऱ्हाणपूर, जि. नांदेड) यास ३ वर्षे सश्रम कारावास व १८ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
केसमध्ये सरकारी वकील अँड. माया क्षीरसागर व सिंगदर गुमानेकर यांनी काम पाहिले आहे. कोर्ट अंमलदार पोलीस नाईक प्रकाश वाघमारे, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ताटे यांनी काम पाहिले. केसचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस हवालदार विलास आंबेकर, विजय शिंदे, उमेश कुतवळ, माऊली शिंदे यांनी केला आहे.