कोलंबो – लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल श्रीलंकेतूनही श्रद्धांजली संदेश जारी करण्यात आले आहेत. लता मंगेशकर यांनी आपल्या सोनेरी आणि अतुलनीय आवाजाने कोट्यवधी हृदयांना स्पर्श केला, संगीत ही वैश्विक भाषा आहे या वाक्याला त्यांनी खरा अर्थ दिला आहे अशा शब्दात श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी लतादिदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
लता मंगेशकर यांच्या आवाजाच्या स्मृती शतानुशतके आपल्या मनात कायम राहतील असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटरवर लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना त्यांचे छायाचित्रही शेअर केले आहे.दिदींचा उल्लेख त्यांनी भारताची संगीत राणी असाही केला आहे.
त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, लता मंगेशकर या भारताच्या नाईटींगेल होत्या. त्यांच्या गाण्याने साऱ्या देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. त्यांच्या गायनातून त्यांच्या स्मृती अजरामर राहतील असेही पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात नमूद केले आहे.
मुख्य विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांनीही मंगेशकर यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे.लता मंगेशकर या एक आख्यायिका आहेत ज्यांनी आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने संस्कृतीचे पूल बांधले आहेत असेही त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.