जम्मू – जम्मू विभागात पोलिसांनी महत्वाची कारवाई करताना एका खतरनाक दहशतवाद्याला अटक केली. झहूर अहमद राठेर उर्फ साहिल उर्फ खालिद असे त्याचे नाव आहे. मागील वर्षी दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या भाजपच्या 3 कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी तो सुरक्षा आणि तपास यंत्रणांना हवा होता.
पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असणाऱ्या दि रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या गटाचा झहूर सदस्य आहे. दक्षिण काश्मीरचा रहिवासी असणारा झहूर पाकिस्तानातून पाठवला जाणारा शस्त्रसाठा स्वीकारण्यासाठी जम्मू विभागातील सांबा जिल्ह्यात गेला. तिथे काही दिवसांपासून तो भाडेकराराच्या घरात राहत होता.
त्याच्या ठावठिकाण्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी यशस्वी मोहीम राबवून त्याला पकडले. एका पोलिसाच्या हत्येतही तो सामील होता. काही वर्षांपूर्वी त्याने पाकव्याप्त काश्मीरात जाऊन दहशतवादाचे आणि शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी लष्कर-ए-मुस्तफा या गटाचा स्वयंघोषित म्होरक्या हिदायतुल्ला मलिक याला अटक केली. अलिकडच्या काळात दोन खतरनाक दहशतवादी जाळ्यात आल्याने त्यांच्या साथीदारांपर्यंत पोहचणे सुरक्षा दलांना शक्य होणार आहे.