पुणे – भूमी अभिलेख विभागाने “ई-चावडी’ या डिजिटल नोटीस बोर्डावर जमीन मोजणीची नोटीसही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आपल्या जमीनक्षेत्रालगत असलेल्या जमिनीची मोजणी कधी आहे, याची माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे.
तलाठी कार्यालय म्हणजेच “चावडी’. यावर महसूल विभागाच्या महत्त्वाच्या नोटीस प्रसिद्ध कराव्या लागतात. यापूर्वी या नोटीस चावडीवरच लावल्या जात. त्यामुळे चावडीला विशेष महत्त्व आहे. काळाच्या ओघात प्रत्येक शेतकऱ्याला अथवा नागरिकांना चावडीवर प्रसिद्ध झालेली नोटीस पाहता येणे शक्य नाही. त्यामुळे चावडीवरील नोटीसची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहचावी, यासाठी भूमि अभिलेख विभागाने ई-फेरफार प्रकल्पांतर्गत “ई चावडी’ हा डिजिटल नोटीस बोर्ड प्रसिद्ध केला आहे.
जमीन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर संबंधित जमिनीलगतच्या शेतकऱ्यांनाही भूमि अभिलेख विभागाकडून नोटीस मुख्यत्वे पोस्टाने पाठवण्यात येतात. अनेक वेळा नोटीस वेळेवर मिळाल्या नाहीत, नोटीस घरी आल्याच नाहीत किंवा भूमि अभिलेख विभागाने नोटीस पाठवलीच नाही, अशा तक्रारी करण्यात येतात. या कारणावरून मोजणीवर शेतकऱ्यांकडून हरकत नोंदवण्यात येते. त्यामुळे मोजणी लांबणीवर पडते. “ई-चावडी’मध्ये आता मोजणीची नोटीस प्रसिद्ध होत असल्याने अशा तक्रारींना वाव राहणार नाही, असा दावा भूमि अभिलेख विभागाने केला आहे.
अशी पाहता येईल नोटीस
www.digitalsatbara. mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर गावनिहाय फेरफार नोटीस व मोजणीची नोटीस पहायला मिळत आहे. या संकेतस्थळावर गेल्यास सुरुवातीस “जमीन मोजणी’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव निवडल्यास जमीन मोजणीच्या नोटीसची माहिती मिळणार आहे. यामध्ये अर्जदाराने अर्ज कधी केला, जमीन मोजणीची तारीख कधी आहे, लगतचे खातेदार कोण आहेत, मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आदी माहिती मिळणार आहे.