आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग; “एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी परिसर गेला दणाणून
वडगाव हवेली – मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी वडगाव हवेली, ता. कराड येथे काल (दि. 28) सायंकाळी कॅंडल मार्च काढण्यात आला. यामध्ये मराठा समाजातील आबालवृद्ध सहभागी झाले होते.
“आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, “एक मराठा, लाख मराठा’, “शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी गाव आणि परिसर दुमदुमून गेला होता. फेरीनंतर मुख्य वेशीत आरक्षणाबाबत समाजबांधवांची प्रबोधनपर भाषणे झाली.
मुख्य वेशीत आबालवृद्ध सायंकाळी 7 वाजता एकत्र आले. तेथे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमा आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मशाल पेटवण्यात आली आणि गावातून कॅंडल मार्चला सुरुवात करण्यात आली. “मराठा समाजाला आरक्षण मिळावे’ आणि “मनोज जरांगे-पाटील यांना एकमुखी पाठिंबा’ असे फलक घेऊन चिमुकले फेरीच्या अग्रभागी होते.
या मार्चमध्ये गावातील सर्वपक्षीय ग्रामस्थ सहभागी झाले होते. आरक्षणाबाबतच्या घोषणा देत गावातून ही फेरी काढण्यात आली. फेरी वेशीमध्ये परत आल्यानंतर युवक व ज्येष्ठांची भाषणे झाली. राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. राजकीय मतभेद विसरून समाजाच्या चळवळीत एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला.
हिंदू-मुस्लिम ऐक्य
यावेळी मुस्लिम समाजातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला. मुस्लिम यूथ फाउंडेशनचे पाठिंब्याचे पत्र चिमुकल्यांनी स्वीकारले. त्यातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले.