भूविकास बॅंक, महसूलच्या संगनमताने फसवणूक 

नगर  – बनावट कागपत्र तयार करुन भूविकास बॅंक व महसूल कर्मचाऱ्यांनी संगनमताने वडिलोपार्जित साडे नऊ एकर शेतजमीन बनावट सातबारा तयार करुन फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी नंदू विधाते यांनी केला आहे. चार वर्षापासून वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील न्याय मिळत नसल्याने आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नंदू विधाते यांचे वडील नाना उर्फ वसंत विधाते यांच्या मालकीची नगर-औरंगाबाद महामार्गावरील जेऊर येथे रस्त्यालगत साडेनऊ एकर जमीन आहे. त्यांच्या वडिलांनी 1985 साली बॅंकेचे कर्ज फेडण्यासाठी जमीन विक्रीचा निर्णय घेतला होता. परंतु, कराराचा भंग करुन मध्यस्ती असलेले भूविकास बॅंकचे अधिकारी व महसूलचे तत्कालीन कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे खरेदीखत करुन घेतले. त्यावेळचे गट नं.186 क्षेत्र 1 हेक्‍टर 8 आर व गट नं. 189 क्षेत्र 2 हेक्‍टर 8 आर क्षेत्राच्या उताऱ्यावर बॅंकेचे नांव असताना बॅंकेचे नांव काढून खोटा सातबारा उतारा तयार करण्यात आला. तत्कालीन तलाठी साक्षीदार होऊन निबंधकांपुढे खरेदीखत करुन घेतले असल्याचा आरोप नंदू विधाते यांनी केला आहे.

या फसवणुकीची 2016 साली माहिती झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, सीएम पोर्टल, प्रांत व तहसिलदार, मंडलाधिकारी व सध्याचे तलाठी यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली. जमीन परत मिळून न्याय मिळावा व या प्रकरणातील भूविकास बॅंकचे अधिकारी आणि महसूलचे तत्कालीन कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.