पुणे – शाळेला सुट्ट्या लागताच दिवाळीला गावी जाण्यासाठी प्रवाशांनी वाकडेवाडी, खडकी कॅन्टोमेंट बोर्ड आणि स्वारगेट याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. पहिल्याच दिवशी विदर्भ, मराठवाडा येथे रात्री उशिरापर्यंत 180 गाड्या फुल्ल भरून सोडण्यात आल्या. तर पुढील चार दिवस बहुतांश गाड्यांचे बुकींग फुल्ल असून, दि. 10, 10 आणि 12 नोव्हेंबरला आरक्षित प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळाने दिवाळीसाठी शिवाजीनगर, खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, स्वारगेट, वल्लभनगर येथून 515 जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार गुरूवारपासून जादा गाड्या सोडण्यास सुरुवात झाली. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेडबरोबरच विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, धुळे या भागात दिवसभारत 180 गाड्या फुल्ल भरून गेल्या. त्यापैकी वाकडेवाडी येथून 100 तर खडकी कॅन्टोमेंट येथून 80 गाड्या होत्या.
दिवाळीला गावी जाण्यासाठी शिवाजीनगर व वाकडेवाडी एसटी स्थानकावर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून माहिती देण्याची सोय खडकी कॅन्टोमेंट येथील मैदानावर करण्यात आली आहे.
एसटी स्थानकांवर महिलांची गर्दी
महिला सन्मान योजनेमुळे दिवाळीतही एसटीला महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गर्दी अधिक असल्याचे दिसून येते. महिला सन्मान योजनेमुळे एसटीला खूपच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी अधिक आहे.
“शिवाजीनगर व वाकडेवाडी येथून दिवाळीसाठी आजपासून जादा गाड्या सोडण्यास येत आहे. विदर्भ व मराठवाड्यात बुधवारी 180 गाड्या फुल्ल भरून गेल्या. तसेच, पुढील चार ते पाच दिवसांच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद आहे.”-ज्ञानेश्वर रणावरणे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, शिवाजीनगर