पूर्व हवेली तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये पैजा
उरुळी कांचन- शिरुर- हवेली मतदारसंघातून भाजपचे उमदेवार आमदार बाबुराव पाचर्णे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार अशोक पवार यांच्या अटीतटीचा सामना रंगला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. यात कोण बाजी मारणार, यावर हवेली तालुक्यातून एक, दोन लाख ते पाच लाखापर्यंत पैजा लागल्या आहेत.
शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघात 2009 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अशोक पवार हे विजयी झाले होते. त्यांनी शिरूर- हवेली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केली होती. 2014 मध्ये आमदार बाबुराव पाचर्णे यांनी विजय खेचून आणला. मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक पवार हे गावातील प्रत्येक कार्यकर्त्यांना भेटून संवाद साधत आहेत.
भाजपचे उमदेवार पाचर्णे हे आपल्याला मंत्रिपद मिळेल या आशेने प्रचार करीत आहेत. सध्या कोण निवडून येणार, हे सांगता येत नाही. इतकी चुरस निर्माण झाली आहे. हवेली तालुक्यावर शिरूरचा कारभारी ठरणार आहे. त्यामुळे पूर्व हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, लोणी काळभोर, वाघोली, लोणीकंदसह मोठ- मोठ्या गावांत लाखो रुपयांच्या पैजा लागल्या आहेत.
- हॉटेल गजबजली
काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी माझा उमदेवार निवडून नाही आला तर मी परत कधीही राजकारण करणार नाही. अशा देखील पैजा लावल्या आहेत. पैज जिंकण्यासाठी सर्व कार्यकर्ते सकाळपासून ते पहाटे मतदारांना भेटत आहेत. तर काहीजण हॉटेलमध्ये गप्पा मारून एकमेकांच्याविरुद्ध पैजा लावत आहेत. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे सध्या हॉटेल गजबजलेली आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायीकांना सोन्याचे दिवस आल आहे.