मतदारांना खुश करण्यासाठी चिकन पार्ट्या
अवसरी- विधानसभा निवडणुक सुरू असल्याने उमेदवाराकडून चिकन पार्ट्यांना ऊत आला आहे. विजयादशमीनंतर चिकनच्या बाजारभावात वाढ झाली असून, श्रावण महिन्यात 100 ते 120 रुपये किलो दराने मिळणारे चिकन आता 160 रुपये किलो दराने ग्राहकांना खरेदी करावे लागत आहे, अशी माहिती कळंब येथील खाजा गरीब नवाज चिकन अँड एग्ज सेंटरचे मालक इसाक शेख यांनी दिली.
श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य असल्यामुळे बॉयलर चिकनचे बाजारभाव पडले होते. त्यावेळेस बॉयलर कोंबडीचे लिफ्टींग दर एका किलोला 54 रुपये होता. आता लिफ्टींग दरामध्ये वाढ झाली असून, बॉयलर कोंबडीचे सध्या लिफ्टिंग दर एका किलोला 80 ते 82 रुपये आहेत. किरकोळ व्यवसाय करणाऱ्या चिकन व्यावसायिकांना होलसेल व्यापारी घाऊक बाजारात 88 ते 90 रुपये किलो रुपये दराने माल देत असल्यामुळे सध्याच्या स्थितीत बॉयलर चिकनचे दर कडाडले आहेत.
एक किलोला 160 रुपये किलो दराने विक्री होत आहे. मध्यंतरीच्या काळात पोल्टी व्यवसाय करणाऱ्या पोल्टी व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे निरगुडसर येथील पोल्टी व्यावसायिक प्रकाश वळसे आणि कळंब येथील प्रमोद पिंगळे, अक्षय वायाळ यांनी सांगितले. व्यवसायिकांनी श्रावण व भाद्रपद या दोन महिन्यांत पोल्टी व्यवसाय बंद ठेवले होते. त्यामुळे मालाची कमतरता जाणवू लागल्याने बॉयलर कोंबडीचे लिफ्टींग दरामध्ये वाढ होत आहे. दसऱ्यानंतर साखर कारखाने सुरू होतात. त्यानंतर उसतोड मजूरांच्या टोळ्या दाखल झाल्यानंतर चिकनला अधिक मागणी होऊन उठाव होण्याची शक्यता आहे.