कुरकुंभ – यश मिळविण्यासाठी कौटुंबिक परिस्थितीची गरज नाहीतर जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आवश्यक आहे. हे कुरकुंभ (ता. दौंड) येथील श्री फिरंगाईमाता विद्यालयातील साक्षी शिंदे हिने दहावी परीक्षेत 97 टक्के गुण मिळवून आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. साक्षीने विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
साक्षीचे वडील दिलीप शिंदे कुरकुंभ येथील पेट्रोल पंपावर काम करतात. आई अंगणवाडीमध्ये काम करते. साक्षीची परिस्थिती हलाखीची आहे. कुरकुंभ येथे घर सोडले तर काहीच स्थावर मालमत्ता कुटुंबाच्या नशिबी नाही. काम केले तरच घरचा उदरनिर्वाह चालतो. खाणारी चार तोंडे आहेत. तुटपुंज्या पगारावरच त्यांचा संसार गाडा धिम्या गतीने हाकला जात आहे. शिंदे दाम्पत्यांची बेताची परिस्थितीची जाणीव दोन्ही मुलींना आहे. साक्षी शाळेतून घरी गेल्यावर आईला घरकामात मदत करीत होती. आई-वडिलांना दोन्ही मुलीच असल्याने मुलाची उणीव कधी साक्षीने आई वडिलांना भासू दिली नाही.
मुलगीही घराचे नावलौकीक करू शकते, तिने दाखवून दिले आहे. तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्कर्ष शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशवराव शितोळे, कार्याध्यक्ष अनिल शितोळे, सचिव सचिन शितोळे, प्राचार्य नानासाहेब भापकर, कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले, पोलीस पाटील रेश्मा शितोळे, ग्रामपंचायत सदस्य विनोद शितोळे, पर्यवेक्षक सिकंदर शेख, संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक, ग्रामस्थ यांच्याकडून साक्षीचे कौतुक होत आहे.