फक्त प्रथेप्रमाणे “श्रीं’ची प्रतिष्ठापना, विसर्जन
पुणे – करोना प्रादुर्भावामुळे यंदाचा 32 वा पुणे फेस्टिव्हल रद्द केला आहे. मात्र, प्रथेप्रमाणे “श्रीं’ची प्रतिष्ठापना व विसर्जन विधिवत होईल, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी दिली.
पुण्यातील महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पुणे फेस्टिव्हलचाही समावेश होतो. पुणे फेस्टिव्हल, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व सरकारचा पर्यटन विभाग यांच्या वतीने याचे आयोजन केले जाते. नाट्य, संगीत, नृत्य अशा विविध क्षेत्रांतील अनेक नामवंत कलाकार याला आवर्जून हजेरी लावतात. आपल्या कलेचे सादरीकरणही करतात.
तसेच शहरातील उगवत्या कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून होते. गेली 31 वर्षे या महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक वसा फुलविण्याचे काम विविध कलाकार आणि आयोजकांनी केले आहे.
यंदा मात्र पुणेकरांना या सांस्कृतिक मेजवानीला मुकावे लागणार आहे. मात्र, पुढील वर्षी मोठ्या उत्साहात, दिमाखात हा महोत्सव होईल, असा विश्वासही कलमाडी यांनी व्यक्त केला.