मुंबई, – राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती केल्याची घोषणा झालेली असतानाच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. राज्यातील तरुणांना नोकरी देण्याची जबाबदारी असलेल्या एमपीएससी आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असून त्यामुळे पोलिसांच्या मुलाखती रखडल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एमपीएससीचे अध्यक्ष दत्तात्रय राजे-निंबाळकर हे 22 सप्टेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आलेल्या अर्जांची छाननी करून तीन नावांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविली. त्यात राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वन सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांचा समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रजनीश सेठ यांची एमपीएससीचे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. मात्र, त्यांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाही.
यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत एमपीएससीला अध्यक्ष नसल्याने उमेदवारांच्या मुलाखती रखडल्याचे म्हटले आहे. राज्यातील तरुणांना नोकरी देण्याची जबाबदारी असलेल्या आयोगाचे अध्यक्षपदच रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. ज्यामुळे राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतील 10 हजार पात्र उमेदवारांच्या मुलाखती रखडलेल्या आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
राज्यातील तरुणांना नोकरी देण्याची जबाबदारी असलेल्या (MPSC) आयोगाचे अध्यक्ष पद च रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे.
ज्यामुळे राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि पोलिस उपनिरीक्षक परीक्षेतील १०,००० पात्र उमेदवारांच्या मुलाखती रखडलेल्या आहे.
राज्यातील लाखो तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहे.…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 6, 2023
राज्यातील लाखो तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. सरकार आणि शासकीय यंत्रणा मात्र ढीम्म कारभार करून तरुणांची निराशा वाढवत आहे. भरती संदर्भात असलेले विविध प्रश्न आणि अडथळे महायुती सरकारने तातडीने सोडवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.