बार्सिलोना – अल्वारो मोराटा याच्या दोन गोलच्या जोरावर अॅटलेटिको माद्रिद संघाने मलोर्का संघाचा 3-0 असा पराभव करत ला लीगा फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली. या सामन्यातील विजयासह अॅटलेटिको संघाने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी आवश्यक असलेली पात्रता मिळवली. ही स्पर्धा ऑगस्ट महिन्यात पोर्तुगालमध्ये होणार आहे.
शनिवारी झालेला सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा बनला होता. मलोर्का संघाचा कमकुवत बचाव अॅटलेटिको संघाच्या पथ्यावर पडला. अल्वारो मोराटा याने 29 व्या मिनिटाला पहिला गोल केला व संघाला आघाडी मिळवून दिली. पहिला हाफ 4 मिनिटांनी वाढवला होता. त्यातही मोराटाने 49 व्या मिनिटाला आणखी एक गोल केला व संघाची आघाडी आणखी मजबूत केली. यावेळी मलोर्का संघाच्या खेळाडूंना या हाफमध्ये आव्हानही निर्माण करता आले नाही.
दुसरा हाफ सुरू झाल्यानंतर अॅटलेटिको संघाने त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरवले. दुसरा हाफ देखील अॅटलेटिकोचाच ठरला. कोके याने 79 व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी 3-0 अशी आणखी भक्कम केली. त्यावेळी मलोर्का संघाने पराभव मान्य केल्याचेच दिसले. मोराटाने या सामन्यातील दोन गोलसह या स्पर्धेत 11 गोल नोंदवले.