पिंपरी, (प्रतिनिधी) – लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील १७५० भाई, फाळकूटदादा, संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांची कुंडलीच पोलिसांनी काढली आहे. यामध्ये त्यांनी केलेले गुन्हे, त्यांच्यावर आतापर्यंत झालेली कारवाई या सर्व गोष्टींची माहिती संकलित केली आहे.
शहरातील अवैध धंदे करणारे, खासगी सावकार यांच्यावरही पोलिसांचे लक्ष असून त्यांचाही यादीत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय दंगे, सामाजिक कलह यातून ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांचीही माहिती घेतली जात आहे.
कोणतीही निवडणूक आली की, रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे हा पोलिसांचा नित्यक्रमच आहे; मात्र यंदा पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारांची विस्तृत यादी तयार केली आहे. या यादीत रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांचा समावेश असेलच; पण शहरात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांचाही समावेश आहे.
पोलीस ठाण्यात यादी तयार
गुन्हेगारांची यादी करण्याचे काम स्थानिक पोलीस ठाण्यांकडे सोपवले आहे. गुन्हेगारांचे नाव, त्यांच्यावर असणारे गुन्हे, शिक्षा झाली असल्यास त्याचे स्वरूप या सर्वांचा समावेश असणार आहे. त्यानंतर गुन्ह्याच्या स्वरुपावरून गुन्हेगारांचे वर्गीकरण केले आहे.
त्यानुसार त्यांच्यावर आचारसंहितेच्या काळात प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच हद्दपारीच्या प्रस्तावावर पोलीस प्रशासनाकडून विचारविनिमय सुरू आहे. पोलिसांच्या या कारवायांमुळे निवडणुका पारदर्शक आणि दहशतमुक्त वातावरणात होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
उमेदवारांना पैसे पुरवण्याचे काम काही खासगी सावकार आणि अवैध धंदा करणारे करतात. त्यांच्यावरही पोलिसांची करडी नजर असून त्यांचाही समावेश या यादीत असणार आहे. निवडणुकीत दारूचा वापरही मतदारांना आकर्षित करण्यासाठी केला जातो. यासाठी मोठ्या प्रमाणात बनावट दारूचे साठे शहरात आणले जातात.
त्यांची तस्करी करणाऱ्या काही टोळ्या सक्रिय आहेत. त्यांचाही समावेश या यादीत करण्यात आला आहे. याशिवाय सामाजिक कलहातून होणाऱ्या गुन्ह्यांमधील आरोपी, गुन्हेगार यांचीही माहिती जमा करण्यात आली आहे. सोशल मीडियावरून सामाजिक तणाव निर्माण केल्याप्रकरणी ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांचाही समावेश या याद्यांमध्ये करण्यात आला आहे.
प्लस टू यादीतील गुन्हेगार
त्यांच्यावर मारहाणीचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत अशा १३५० गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. तसेच चोरी, लुटमार किंवा इतर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या ३९८ गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून गेलेल्या दोन हजार १२२ आरोपींची यादीही पोलिसांनी तयार केली आहे. याशिवाय न्यायालयाने फरार घोषित केलेल्या २३ आरोपींची यादीही वेगळी आहे. या सर्वांवर कारवाई करण्यासाठी आगामी काळात कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी आदी कारवाया पोलीस सुरू करणार आहेत.
हे असणार यादीत
• सराईत गुन्हेगार
• खासगी सावकार
• गुन्हेगारी टोळ्या
• विविध तस्कर
• समाजकंटक
• सोशल मीडियासंबंधी गुन्हे दाखल असणारे