इंदापूर : जागतिक स्तरावरील मिसेस व मिस हेरिटेज इंटरनॅशनल 2022ही स्पर्धा 14 ते19 नोव्हेंबर या कालावधीत क्वालालंपूर मलेशिया येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे स्वरूप “मिस व मिसेस युनिव्हर्स’ सारखेच असते; परंतु वेगळ्या स्वरूपात सादरीकरण करावे लागते. या स्पर्धेत मिसेस गटात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान गौरी अशोक थोरात तावरे यांना मिळाला आहे.
राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकून भारतीय परंपरा जागतिक स्तरावर मांडण्याचा मान गौरी यांना मिळाला आहे. इम्प्लॅनेट सिंगापूर ही कंपनी या स्पर्धेची आयोजक तर मृणाल गायकवाड या भारतातर्फे नॅशनल डायरेक्टर आहेत. 25 ते 30 देशांचे स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. त्याचबरोबर रशिया, चीन, जपान, युक्रेन, पाकिस्तान, न्यूझीलंडसारख्या देशाचे स्पर्धक सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत त्यांचे दुर्गराज रायगड या विषयावरील अप्रतिम सादरीकरण त्यांना विजेतेपदाचा मुकूट देऊन सन्मान झालेला आहे. गौरी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातील आहे. माहेर वालचंदनगर (ता. इंदापूर) तर सासर लोणी देवकर येथील आहे. दोन्ही गावे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात ग्रामीण भागातील आहेत. गौरीचे पती अशोक थोरात हे महाराष्ट्र पोलीस दलात अपर अधीक्षक या उच्चपदावर कार्यरत आहेत.
हेरिटेज जीवनपद्धती
गौरी यांनी जिजाऊ मॉंसाहेबांच्या धगधगत्या जीवन प्रवाहावर संपूर्ण राज्यात एक तासाचे एकपात्री 160 हून अधिक नाट्यप्रयोग सादर केले आहेत. महाराष्ट्रातील गड, किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, लेण्या यावर त्यांचा अभ्यास आहेच; परंतु तलवारबाजी, लाठी काठी व घोडेस्वारी यामध्ये त्या अत्यंत तरबेज आहेत. अगदी लहानपणापासूनच त्यांची आई विजयश्री व वडील विश्वजीत तावरे यांनी गौरीला किल्ले फिरून दाखविले.