– विजय लाड
कोयनानगर – सह्याद्रीचे भूषण व अभियांत्रिकीचे आश्चर्य असणाऱ्या कोयना धरण व जलविद्युत प्रकल्पाला उद्या दि. 16 मे रोजी 61 वर्षं पूर्ण होत असून हा प्रकल्प 62 वर्षात पदार्पण करीत आहे. सहा दशकात राज्यातील जनतेला तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या दोन हजार मेगावॅट क्षमतेने वीजनिर्मिती करणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पातून आतापर्यंत दोन लाख दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.
1962 पासून अविरतपणे स्वच्छ, नितळ व प्रदूषणविरहीत वीजनिर्मिती करणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पाला 62 वर्षात दोन लाख अब्ज निव्वळ नफा झाला आहे. राज्याला सर्वात जास्त महसूल कोयना प्रकल्पातून मिळत असला तरी कोयनेमुळे झालेला औद्योगिक व सामाजिक विकास, राज्यात दृश्य- अदृश्य परिणामांची मोजता येणे अशक्य आहे.
“प्रकल्प एक पण फायदे अनेक’ असणारा कोयना प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे दरवर्षी 60 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. महाराष्ट्रातील एकूण जलविद्युत निर्मितीपैकी 59 टक्के वीज राज्यात एकटा कोयना जलविद्युत प्रकल्प तयार करतो. प्रकल्पाच्या चार टप्प्यांचा विचार करता प्रकल्पातून दरवर्षी मिळणारे उत्त्पन्न 500 ते 600 कोटी रूपये होते.
कोयना जलविद्युत प्रकल्प राज्याला व देशाला तीन प्रकारे योगदान देऊन राष्ट्रसेवा बजावत आहे. तसेच या प्रकल्पाने कोळसा टंचाई, तसेच महत्तम वीज मागणीच्या काळात वीजनिर्मिती करून राज्यातील जनतेची गरज भागविण्याची कामगिरी केली आहे. आणि ऊर्जा क्षेत्रात आपले महत्व देशात अधोरेखित केले आहे.
कोयना प्रकल्पाच्या उजव्या पायथ्याजवळ 80 मेगावॅट क्षमतेचा उदंचन प्रकल्पाच्या बहुउद्देशीय कामाचा प्रस्ताव एसएलटीसीकडून शासनाला सादर झाल्यावर एका महिन्यात या प्रकल्पाला मान्यता देणार आहे.
– अमृता इनामदार (अव्वल सचिव, जलसंपदा विभाग)
प्रकल्पाच्या उजव्या पायथ्याजवळील 80 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचे काम दोन महिन्यात सुरू होईल. त्यानंतर प्रकल्पाचा एक हजार मेगावॅट क्षमतेचा पाचवा आणि सहावा टप्पा अशा दोन प्रकल्पाला गती देणार आहे. विद्युत, सिंचन, पर्यटन या माध्यमातून तिमिराकडून तेजाकडे ही ओळख गडद करणार.
– एच. व्ही. गुणाले (मुख्य अभियंता, कोयना प्रकल्प)
कार्यतत्परता, कर्तव्यनिष्ठा व सांघिक प्रयत्नांच्या जोरावर कोयना जलविद्युत केंद्र शक्तिपीठ बनले आहे. उच्चांकी वीजनिर्मिती करून अशीच अनेक यशोशिखरे पादाक्रांत करुन महानिर्मितीला अतुच्च्य शिखरांवर नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
– संजय चोपडे (मुख्य अभियंता, कोयना जलविद्युत प्रकल्प महानिर्मिती)
कोयना एकूण वीजनिर्मिती
टप्पा 1 व 2- 1 लाख 33 हजार 792 दशलक्ष युनिट
टप्पा 3 मधून- 30 हजार 978 दशलक्ष युनिट
टप्पा 4 मधून- 35 हजार 847 मेगावॅट
कोयना धरण डावा पायथा वीजगृह – 4 हजार 970 मेगावॅट