मंचर (पुणे) – मंचर (ता. आंबेगाव) येथील उपजिल्हा रुग्णालयात 100 बेडचे कोविड रुग्णालय येत्या तीन-चार दिवसांत सुरू होणार असून, त्यामध्ये 70 ऑक्सिजन बेड आहेत. अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी कोविड केअर सेंटरमध्ये 570 बेड आहेत; पण अजून 430 बेड वाढवावेत. सर्व रुग्णालयांमध्ये औषधाचा पुरेसा साठा व मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
अवसरी फाटा-मंचर (ता. आंबेगाव) येथे करोना आढावा बैठक झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री वळसे पाटील म्हणाले, करोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. नागरिकांचा संचार वाढला आहे. पोलीस यंत्रणेने वचक निर्माण होईल, असे काम करावे. मृत्यूचा दर कमी करण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. मृत्यू झालेल्यांचे डेथ ऑडिट करावे. कोविड चाचण्यांवर भर द्यावा. रुग्णांना बाहेरून विकत औषधे आणण्यास लावू नका.खासगी डॉक्टरांचा सहभाग वाढवा. इतर आजारी रुग्णांना मंचर उपजिल्हा रुग्णालयाऐवजी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात व प्रसूतीसाठी मंचर येथील गेटवेल हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करावी. दहापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या धोकादायक गावांना साथीच्या आजारापासून अलिप्त ठेवण्यासाठी गावपातळीवर समित्या स्थापन करून योग्य निर्णय घ्यावेत. जनजागृतीवर भर द्यावा. प्रत्येक कुटुंबाने काळजी घेऊन या आजाराचा शिरकाव गावात होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.
- नागापूरला 100 बेडचे कोविड सेंटर करणार
नागापूर (ता. आंबेगाव) येथील थापलिंग देवस्थानाच्या जागेमध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 100 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले जाईल. ऊसतोडणी कामगारांसह इतरांनाही या हॉस्पिटलचा उपयोग होईल.