पुणे- वाहनचोरी करणाऱ्या कुप्रसिध्द बचक्या टोळीतील दोन सदस्यांना हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून तब्बल दहा चोरीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. हे गुन्हेगार शेल्टर होममध्ये राहून गुन्हे करायचे.
विष्णू भाऊराव कुंडगीर(21,मुळगाव-खर्डा, उदगीर, जि.लातूर) व पवन व्यंकट पाटील(20, मुळागाव निलंगा, जि.लातून) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तपास पथकातील अधिकारी सौरभ माने, पोलीस नाईक नितीन मुंढे, पोलीस शिपाई प्रशांत टोणपे हे जबरी चोरी, घरफोडी आणी वाहनचोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी नाकाबंदी करुन वाहन तपासणी करत होते. इतक्यात त्यांना दुचाकीवरुन दोघेही आरोपी भरधाव वेगाने येत असल्याचे दिसले.
त्यांनी थांबण्याचा इशारा केला असता, आरोपी पळून जाऊ लागले. मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना अडथळा आणत पकडले. त्यांच्याकडील दुचाकीबद्दल चौकशी केली असता, त्यांनी ही दुचाकी सहा ते सात दिवसांपुर्वी हडपसर येथील एका सोसायटीमधून चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करुन कसून चौकशी केली असता त्यांनी शहराच्या हद्दीतून चोरलेल्या दहा दुचाकी काढुन दिल्या. यातील सहा दुचाकींच्या मालकांचा शोध लागला असून उर्वरीत चार दुचाकींच्या मालकांचा शोध सुरु आहे. या दुचाकींची किंमत 2 लाख 55 हजार इतकी आहे. दोन्ही गुन्हेगार सराईत असून ते बचक्या टोळीचे सक्रीय सदस्य आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या सुचनेनुसार उपनिरीक्षक सौरभ माने, सहायक फौजदार युसुफ पठाण, पोलीस कर्मचारी राजेश नवले, सैदोबा भोजराव, नितीन मुंढे, गोविंद चिवळे व प्रशांत टोणपे यांनी केली.