हॅपी कॉलनीतील प्रकार
कोथरुड(प्रतिनिधी) – हॅपी कॉलनी लेन नंबर ३ मधील अभिषेक, आंनदश्री अंकुरश्री या सोसायट्या असलेल्या चौकात रस्त्यावर पडलेले झाड गेल्या तीन दिवसांपासून हलवण्यात न आल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात हे झाड रस्त्यावर पडले मात्र ते अद्यापपर्यंत हलवण्यात न आल्याने हॅपी कॉलनी मधील नागरिकांना ये जा करण्यात अडचणीचा सामना करावा लागत असून कॉलनी च्या पुढे असणाऱ्या गोसावी वस्ती मधील नागरिकांनाही रस्ता बंद असल्याने अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
झाड पडल्यानंतर अग्निशमन दल व पालिकेच्या उद्यान विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले असून उद्यान विभागाचे स्थानिक भागासाठी असणारे हॉर्टीकल्चर मिस्त्री मोबाईल घेत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे किशोर कांबळे यांनी केला आहे. ज्या दिवशी वादळ झाले त्या दिवशी अनेक ठिकाणी झाड पडीच्या घटना घडल्या त्यामुळे त्या दिवशी प्रशासनाला झाड हलवण्यास जमले नसेल तर समजले जाऊ शकते पण दोन दिवसांनंतर ही झाड रस्त्यावरच पडून राहत असेल तर यातून प्रशासनाचा हलगर्जी पणा दिसून येत असल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे.