कोलकाता, दि. 15- दोन वेळा तृणमूल कॉंग्रेसच्या तिकीटावर आमदार झालेल्या कलाकार देबश्री राय यांनीही अखेर ममता बॅनर्जी यांना कायमचा रामराम करत पक्षाचा राजीनामा दिला आहे. देबश्री गेल्या काही काळापासून पक्षात नाराज होत्या आणि आपला सातत्याने अपमान केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. पक्षातून लवकरच बाहेर पडणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले होते.
त्यानुसार त्यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला फोनवरून धमकी दिली जात असल्याचे व तृणमूल कॉंग्रेसचे लोकच धमकी देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्याला रायदीघी मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ नये अशी मागणी त्यांनी केली होती.
त्यानुसार त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. मात्र अन्य कोणत्याही मतदारसंघातून त्यांना रिंगणात उतरवण्यात आले नव्हते. एकप्रकारे पक्षाने त्यांना आपला इरादा अप्रत्यक्षपणे कळवला होता व त्यानुसार आता त्यांनीही आपला निर्णय घेत पक्षाला रामराम ठोकला आहे.