पुणे – देशभरात सध्या करोना प्रतिबंधक लसीचं लसीकरण जोरात सुरू आहे. दररोज हजारो लोकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. सध्या देशातील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य क्रमाने लस देण्यात येत आहे. मात्र पुण्यात आज वेगळ्या लसीचा पुरवठा झाल्याने गोंधळ झाल्याचे समोर आले आहे.
लसींच्या पुरवठ्यावरून हा गोंधळ निर्माण झाला होता. कोविशील्डच्या ऐवजी ‘कोव्हॅक्सिन’चा साठा मिळाल्याने नियोजित लसीकरणामध्ये अडथळा आला. त्यामुळे आज लसीकरण नियोजित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अचानक लसीकरण रद्द झाल्याचे एसएमएस मोबाईलवर मिळाले आहेत.
या व्यतिरिक्त ज्यांची लसीकरणाची वेळ उद्या निश्चित करण्यात आली होती, त्यांनाही अशाच पद्धतीचे मेसेज आले आहेत. लसीकरणासाठी पुन्हा नव्याने नोंदणी करून वेळ निश्चित करून घेण्यास सुचवण्यात आलं आहे. या सगळ्या प्रक्रियेमुळे आज लसीकरणामध्ये दिवसभर मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.
दरम्यान महापालिकेकडून जो खुलासा करण्यात आला आहे. त्यानुसार कोविशील्डचा साठा संपल्याने आता आधी नोंदणी केलेल्या व्यक्तींना नवीन नोंदणी करावी लागणार आहे. आधीच्या सगळ्यांच्या अपॉइंटमेंट रद्द होऊन त्यांना नवीन नोंदणी केल्यानंतर लस देण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.