रोम, दि. 15 – करोनाचा प्रादुर्भाव नव्याने वाढायला लागल्याने निम्म्या इटलीमध्ये नव्याने कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नव्याने वाढत असलेल्या संसर्गामुळे इटलीतील रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढायला लागली असून रुग्णालय व्यवस्थापनावर त्याचा अतिरिक्त ताण यायला लागला आहे.
देशातील 9 प्रांतांमधील बहुतेक शाळा, महाविद्यालये आज बंद होती. ट्रेन्टो या स्वायत्त प्रांतातील हॉटेलांमध्ये केवळ पार्सल दिले जात होते. उत्तरेकडील लोंबार्डीपासून दक्षिणेकडील पुगलियापर्यंत तसेच लाझिओ शहरासह राजधानी रोमच्या दरम्यानच्या परिसरात अनेक ठिकाणी रेड झोन घोषित करण्यात आले आहेत. तर उर्वरित देशात अन्यत्र ऑरेंज झोनचा लॉकडाऊन आहे. सॅर्दिना भागात संसर्गाला नियंत्रित केले जात असल्याने हा भाग व्हाईट झोनमध्ये आहे, या भागात ब्रिटनमधील विषाणू सपडला होता.
देशातील संसर्ग प्रवण क्षेत्रांच्या वर्गीकरणाचा आढावा अरोग्य मंत्रालयाकडून दर आठवड्याला घेतला जात आहे. आतापर्यंत फारच थोड्या ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन लागू होता. मात्र अतिसंवेदनशील विषाणूच्या स्ट्रेनमुळे काही भागात नव्याने रेड झोन घोषित केला गेला असून कठोर उपाय योजनाही लागू केल्या गेल्या आहेत.