शारजा – वेगवान गोलंदाज शिवम मावी व लॉकी फर्ग्युसन यांच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 86 धावांनी धुव्वा उडवला. या विजयाच्या जोरावर कोलकाताने यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफमधील प्रवेशाच्या आशाही कायम राखल्या आहेत.
कोलकाताने विजयासाठी दिलेल्या 172 धावंचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. राहुल तेवतिया 44 व शिवम दुबे 18 यांचा अपवाद वगळता राजस्थानच्या एकाही फलंदाजाला दोन अंकी धावा करता आल्या नाहीत. कोलकाताच्या गोलंदाजांनी केवळ 1 धाव अवांतर दिली ती देखील बाईज होती. यावरून कोलकाताने किती अचूक गोलंदाजी केली हे स्पष्ट होत आहे.
मावीने 21 धावांत 4 तर, फर्ग्युसनने 18 धावांत 3 गडी बाद केले. वरुण चक्रवर्ती व शकिब अल हसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. या विजयासह कोलकाताने मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी जवळपास संपुष्टात आणली आहे.
राजस्थानची सुरुवात अतिशय खराब झाली. कोलकाताचा फिरकीपटू शकिब अल हसनने पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वालवा तर, दुसऱ्या षटकात मावीने सॅमसनला बाद केले. त्यानंतर फर्ग्युसनने एकाच षटकात लियाम लिव्हिंगस्टोन व अनुज रावत यांना बाद करत राजस्थानच्या डावाला खिंडार पाडले. केवळ 13 धावांत राजस्थानचे 4 फलंदाज बाद झाले. त्यानंतर मावीने ग्लेन फिलिप्सला बाद केले. मावीने दुबेचाही त्रिफळा उडवला. ख्रिस मॉरिसचा अडसर वरुण चक्रवर्तीने दूर केला. जयदेव उनाडकटला फर्ग्युसनने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर चेतन सकारीया धावबाद झाला. 36 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांसह 44 धावांची खेळी करणारा राहुल तेवतिया बाद झाला आणि कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
त्यापूर्वी नवोदित व्यंकटेश अय्यरच्या आक्रमक फलंदाजीनंतरही घसरलेला कोलकाता नाईट रायडर्सचा डाव शुभमन गिलने अर्धशतकी खेळी करत सावरला. मात्र, अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्याने त्यांना 20 षटकांत 4 गडी गमावून 171 धावांपर्यंत मजल मारता आली.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकत कोलकाताला प्रथम फलंदाजी दिली. गिल व अय्यर यांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर दडपण आणले. या जोडीने 79 धावांची दमदार सलामी दिली. यावेळी गिलपेक्षा अय्यर जास्त आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने 35 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 38 धावांची खेळी केली.
त्यानंतर विनाकारण यष्टी सोडून खेळण्याच्या प्रयत्नात राहुल तेवतियाच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. त्यानंतर गिलने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने नीतिश राणा, राहुल त्रिपाठी यांच्यासह महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरताना संघाला शतकी धावसंख्या गाठून दिली. गिलने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवताना तो 56 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 44 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 2 षटकार फटकावले. गिल परतल्यावर दीनेश कार्तिक व कर्णधार इयान मॉर्गन यांनी आक्रमक फटकेबाजी करत संघाला दीडशतकी धावांच्या पुढे मजल मारून दिली. राजस्थानकडून ग्लेन फिलिप्स, चेतन सकारीया व ख्रिस मॉरीस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 4 बाद 171 धावा. (शुभमन गिल 56, व्यंकटेश अय्यर 38, राहुल त्रिपाठी 21, नीतिश राणा 12, दीनेश कार्तिक नाबाद 14, इयान मॉर्गन नाबाद 13, ग्लेन फिलिप्स 1-17, चेतन सकारीया 1-23, ख्रिस मॉरीस 1-28). राजस्थान रॉयल्स – 16.1 षटकांत सर्वबाद 85 धावा. (राहुल तेवतिया 44, शिवम दुबे 18, शिवम मावी 3-21, लॉकी फर्ग्युसन 3-18, शकिब अल हसन 1-1, वरुण चक्रवर्ती 1-14).