कोल्हापूर – तत्कालीन काळात शाहू महाराजांनी सुवर्णकारांना स्थैर्य दिले. त्याचा परिणाम आज दिसतो आहे. कोल्हापूरची सुवर्ण कला ही जगमान्य झाली असल्याचे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले. गुजरी सुवर्ण जत्रा(पारंपरिक दागिन्यांचे प्रदर्शन व विक्री) चे उद्घाटन आज गुजरी येथे त्यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी आमदार जयश्री जाधव जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, या सुवर्ण कलेला उर्जितावस्था आणण्यासाठी पालकमंत्र्यांनी यावरील जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे प्रयत्न करावेत अशी मागणीही महाराजांनी यावेळी केली. जिल्ह्यातील सुवर्णकारांनी आपल्या कलेद्वारे कोल्हापूरची ओळख भारतभर केली आहे. ती वाढवून आता संपूर्ण जगात करावी अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली तर गुजरी यात्रेच्या आयोजनामुळे सराफांकडून ग्राहकांना मनपसंत व पारंपारिक दागिने खरेदी करता येतील असे जिल्हाधिकारी म्हणाले. प्रास्ताविक कोल्हापूर सराफ व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी केले.
दि २२ ते २४ एप्रिल दरम्यान सकाळी १० ते रात्री १० या वेळेत ही गुजरी सुवर्ण यात्रा सुरू राहणार असून या यात्रेत पारंपारिक दागिन्यांच्या मजूरीवर १० ते ३० टक्क्यांपर्यंत सुट देण्यात येणार आहे.
ग्राहकांसाठी या यात्रेत दागिन्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे असणार आहेत –
कोल्हापुरी साज, मनी मंगळसूत्र, कुशी, वजरती, लमबट माळ, गोलमाळ, नक्षीमनी, पैलू माळ बोरमाळ, शिंदेशाही तोडा, पुतळा, बुगडी, अश्या प्रकारचे दागिने राहणार आहेत. तर नवीन दागिन्यांमध्ये टेम्पल ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी, बंगाली ज्वेलरी यांचा समावेश असणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या गुजरी सुवर्ण महोत्सव यात्रेत ग्राहकांनी एकदा का होईना येऊन, कुछ पल तो ‘गुजारने ‘ चाहिए एवढं मात्र नक्की. याप्रसंगी नगरसेवक ईश्वर परमार, उपाध्यक्ष विजय हावळ, सेक्रटरी प्रीतम ओसवाल, तेजस धडाम, संजय रांगोळे, विजय भोसले, अशोक ओसवाल, ललित ओसवाल यांच्यासह सराफ व्यापारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.