कोल्हापूर: काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोल्हापूर(प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे गुरुवारी (ता.२ डिसेंबर) निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांन उपचारासाठी हैदराबाद येथे हलविले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. राजकीय, सामाजिक, क्रीडा, कारखानदारी अशा विविध क्षेत्रांशी ते निगडीत होते. दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘आण्णा’या नावांनी ते सर्वपरिचित होते. कोल्हापुरातील सामाजिक संस्था, संघटना, फुटबॉल संघाशी त्यांचा निकटचा संबंध होता. ते फुटबॉल संघ, खेळाडूंचे आधारवड होते. शिवाय त्यांनी कारखानदारीच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला होता. २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरुद्ध विजय मिळवला होता. दरम्यान गेले काही दिवस ते आजाराचा सामना करत होते. हैदराबाद येथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात आले. काँग्रेस कमिटी मध्ये त्यांचे पार्थिव काही काळ अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले होते. या ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर,भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील इतर आमदार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आमदार जाधव यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलीय.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पार्थिवाचे काँग्रेस कमिटीत दर्शन घेतलं यानंतर जाधव यांचे पार्थिव त्यांच्या सम्राट नगर परिसरातील निवासस्थानी आणण्यात आलं. यानंतर त्यांची अंतयात्रा कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्त्यावरून पंचगंगा स्मशानभूमीत दाखल झाली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री ,आमदार, खासदार विविध तालीम संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे अध्यक्ष कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार चंद्रकांत जाधव यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.