कोहली बनला सहा हजारी मनसबदार

चेन्नई  – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलमध्ये सहा हजार धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे. आयपीएल स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना कोहलीने ही कामगिरी केली. टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीने 6000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला कर्णधार ठरला आहे.

यंदाच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध विराटने 29 चेंडूत 33 धावा केल्या. टी-20 क्रिकेटच्या 305 सामन्यांच्या 290 डावात त्याने आता 9764 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 5 शतके आहेत, तर 113 धावांची खेळी ही त्याची टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे.

टी-20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने 252 टी-20 सामन्यांत कर्णधार म्हणून 5872 धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर गौतम गंभीर (166 डावात 4242 धावा), अरन फिंच चौथ्या (126 डावात 4051 धावा) आणि पाचव्या क्रमांकावर रोहित शर्मा (140 डावात 3929 धावा) आहेत.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटबद्दल बोलायचे झाले, तर त्यातही कर्णधार म्हणून धावा काढण्याच्या बाबतीत कोहली अव्वल स्थानी आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीने 45 सामन्यात 1502 धावा केल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.