ग्रामीण भागात तीन आठवड्यांत तपासणी
पुणे – ग्रामीण भागात सुपर स्पेडर सर्वेक्षणामुळे करोनाची वाढती साखळी काही अंशी ब्रेक करण्यात यश मिळत आहे. मागील वीस दिवसांत केलेल्या सर्वेक्षणामध्ये 1 हजार 372 बाधित सापडले आहेत. शहरासह ग्रामीण भागात फेब्रुवारी अखेरपर्यंत दररोज चारशे ते पाचशेच्या आसपास सापडणारी बाधित संख्या आज तब्बल दोन ते अडीच हजारांवर पोहचली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून ही संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे.
त्यामध्ये किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, व्यापारी म्हणजे ज्या व्यक्तींचा अनेक व्यक्तींबरोबर संपर्क येतो, अशी व्यक्ती ही सुपर स्प्रेडर ठरते. त्यामुळे प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची भीती अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाने या सुपर स्प्रेडर सर्वेक्षणाला सुरवात झाली. 18 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान, ग्रामीण भागात जवळपास 71 हजार 454 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस हजार बाधितांना करोनाची लक्षणे आढळून आली. त्यांची नमुने तपासणी केली असता, 1 हजार 372 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तपासणी संख्येच्या तुलनेत बाधित संख्येचे प्रमाण कमी असले तरी, हे व्यक्ती संसर्ग वाढीला जबाबदार ठरू शकतात. त्यामुळे ही साखळी तोडण्यास आरोग्य विभागाला काहीसे यश आले.
दहा दिवसांत 906 बाधित
25 मार्च ते 8 एप्रिलदरम्यान ग्रामीणमधील 31 हजार 741 सुपर स्प्रेडर व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 9 हजार 864 व्यक्तींना लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांची नमुने तपासणी करण्यात आली. तर 906 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.