आम्ही नाही जुमानत! कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी; कोरोना नियमांचे तीनतेरा

नवी दिल्ली : एकीकडे देशात कोरोनाचे लाखोंनी रुग्णवाढ होत आहे, कोरोनाला रोखण्यात प्रशासनाचे हाल होत आहे. तर दुसरीकडे लोकांचे बेजबाबदारपणे वागणे समोर येत आहे. जागतिक स्तरावर मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक अशी ओळख असणाऱ्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी भक्तांनी रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी लोकांकडून करोनाच्या नियमांचे जाहीरपणे उल्लंघन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन यावेळी करण्यात आले नाही.

गंगा नदीत स्नान करण्यासाठी पवित्र दिवस मानल्या जाणाऱ्या शाही स्नानाच्या एक दिवस आधी लाखोंच्या संख्येने भक्तांनी नदीकिनारी गर्दी केली होती. आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमांचे जाहीरपणे हे उल्लंघन होते. अनेक भाविकांनी यावेळी हरिद्वारला येताना निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे सरकारने अनिवार्य केले असल्याने करोना हा येथे चिंतेचा विषय नसल्याचा दावा केला.

१२ वर्षातून एकदा होणारा कुंभमेळा सध्या करोनाच्या संकटात पार पडत आहे. देशात करोनाची दुसरी लाट आलेली असून गेल्या २४ तासांत दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. कुंभमेळ्यासाठी सर्व नियमांचं पालन केलं जात असलं तरी तज्ञांनी गर्दी करु नये आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. अनेक भक्तांनी याठिकाणी गाईडलाइन्सचं पालन करणं शक्य नसल्याचं सांगितल आहे.

हरिद्धारमध्ये गेल्या २४ तासांच ३८६ करोना रुग्ण आढळले आहेत. शहरात सध्या २०५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन आणि अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत जवळपास १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ४ एप्रिलला शहरात १७३ रुग्ण आढलले होते तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ८३७ होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.