मेलबर्न – बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दोन्ही डावात रवीचंद्रन अश्विनने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 2 असे संपूर्ण सामन्यात 5 गडी बाद करत एका अनोख्या विक्रमाची नोंद केली. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात अश्विनने श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा विक्रम मोडीत काढला आहे.
अश्विन सर्वात जास्त डावखुऱ्या फलंदाजाला बाद करणाऱ्या गोलंदाजामध्ये पहिल्या स्थानावर आला आहे. याआधी हा विक्रम मुरलीधरनच्या नावावर होता. मेलबर्न कसोटीत दोन्ही डावात मिळून घेतलेल्या पाच बळींमुळे अश्विनचे 375 कसोटी बळी झाले असून त्यात 192 डावखुरे फलंदाज होते.
मुरलीधरनच्या 800 कसोटी बळींपैकी 191 डावखुरे फलंदाज आहेत. या कसोटीत मिशेल स्टार्कला बाद करत अश्विनने मुरलीधरनचा हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. डावखुऱ्या फलंदाजांना बाद करणाऱ्या गोलंदाजात इंग्लंडचा जेम्स अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर तर, ग्लेन मॅकग्रा चौथ्या स्थानावर, शेन वॉर्न पाचव्या आणि भारताचा अनिल कुंबळे सहाव्या स्थानावर आहे.