शहराच्या विकासासाठी विधानसभा लढविणार- किरण काळे

 शहरातील वाढत्या गुंडगिरीच्या विरोधात जनआंदोलन

नगर: गेल्या तीस वर्षांपासून नगर शहर विकासापासून वंचित राहिले आहे. काही संधीसाधू नेते राजकीय भांडवल करीत स्वत:ची राजकीय पोळी भाजत आहेत. यामुळे नगरची राज्यभर बदनामी झाली असून याबद्दल सामान्य नगरकरांच्या मनात तीव्र संताप आहे. या नेत्यांना आता जनता वैतागली असून नगरकरांना अपेक्षित असणारा सक्षम तिसरा पर्याय देण्यासाठी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

शहराच्या विकासासाठी आणि नगरकरांच्या मानगुटीवर बसलेल्या तथाकथित नेत्यांच्या तावडीतून शहराची कायमची सुटका करण्यासाठी नगरकरांचे ऐतिहासिक जनआंदोलन उभारून निर्णायक लढाई लढणार असल्याचे आणि त्यासाठी काहीही झाले तरी माघार घेणार नसल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. शहराच्या सर्वच नेत्यांनी कायम सेटलमेंटच राजकारण केले. महानगरपालिकेत आलटून पालटून सत्ता घेवून ती वाटून खाल्ली. एमआयडीसी विकसित होऊ दिली नाही. उद्योजकांच शोषण केले. शहरातील नेत्यांनी गुंडांना हाताशी धरून कामगार युनियनच्या माध्यमातून कामगार आणि उद्योजक यांना वेठीस धरले. यामुळे नवीन उद्योग तर आले नाहीच पण आहेत ते अनेक बंद पाडले गेले. त्यामुळे एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी शहरातील युवकांना संघटीत करून जनआंदोलन उभे करणार आहे.

शहरातील गुंडगिरीमुळे सर्वसामान्य नगरकर त्रस्त झाला आहे. रोजगार नसल्याने युवक गुंडगिरीकडे वळला असून त्याचा फायदा हे राजकीय नेते घेत आहेत. आज तडीपारीची यादी पाहिल्यानंतर दीड ते दोन हजार युवकांची नावे येतात. हे शहरासाठी दुदैवी आहे. या गुंडगिरी संपविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भाजपला शहरात मिळालेले विक्रमी मताधिक्‍य आत्मपरीक्षण करायला लावणारे शहरात पक्षाचे दोन आमदार आहेत. तरी होम ग्राउंडवर आमच्या उमेदवाराची झालेली सुमारे 54 हजार मतांची पीछेहाट ही धोक्‍याची घंटा आहे. सन 2010 पासून राष्ट्रवादी युवक संघटनेत काम करीत आहे. खा.सुप्रिया सुळे यांच्या मुळेच मला युवक जिल्हाध्यक्ष तसेच राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाली. विकासात्मक दूरदृष्टी असणा-या स्वच्छ प्रतिमेच्या सक्षम उच्चशिक्षित युवा नेतृत्वाची आज नगर शहराला गरज आहे. मी व्यवस्थापन शाखेचा पदवीधर असून सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. मला कोणतीही वलयांकित राजकीय पार्श्वभूमी नाही. मी लवकरच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे, प्रभारी आ.दिलीप वळसे पाटील, निरीक्षक अंकुश काकडे आदींच्या भेटी घेवून उमेदवारीची मागणी करणार असल्याचे काळे यांनी यावेळी ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.