काबुल – अफगाणिस्तानचे पाकिस्तानमधील राजदूत नजिब अलिखिल यांच्या कन्येचे अलिकडेच पाकिस्तानमध्ये अपहरण करण्यात आले होते. काही तास डांबून ठेवून नंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. हे अपहरण 16 जुलै रोजी झाले होते.
या प्रकाराबद्दल अफगाणिस्तानने पाकिस्तानकडे तीव्र संताप व्यक्त केला आहे. या अपहरणनाट्यामागील दोषींना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कावाई करण्यात यावी, अशी मागणी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडे केली आहे.
अफगाणिस्तानचे पाकिस्तानातील राजदूत नजिब अलिखिल यांच्या कन्या सिलसिला अलिखिल या शुक्रवारी आपल्या घरी परतत असताना काही अज्ञात अपहरणकर्त्यांनी त्यांचे अपरण केले होते. काही तास त्यांना डांबून ठेवण्यात आले होते.
त्या काळात त्यांचा छळ देखील करण्यात आला होता. थोड्यावेळाने त्यांची सुटका झाली. सिलसिला अलिखिल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असेही अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.