नवी दिल्ली – इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाअली खोमेनी यांचे इन्साटाग्राम आणि फेसबुकचे खाते मेटा कंपनीने हटवले आहे. हमास या दहशतवादी संघटनेने गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे समर्थन करणारी पोस्ट खोमेनी यांनी केली होती.
हमासने केलेल्या या हल्ल्यानंतर इस्रायलने सुरू केलेली लष्करी कारवाई गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. हे युद्ध अजूनही थांबण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. खोमेनी यांनी केलेल्या हमासच्या समर्थनाच्या पोस्टवर मेटाने टीका केली असून खोमेनी यांची खाती हटवली आहेत.
खोमेनी यांची खाती बंद करण्यासाठी मेटाने कोणतीही ठोस कारणे दिलेली नाहीत. मात्र धोकादायक संघटना आणि व्यक्तींविषयीच्या धोरणाचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल ही खाती हटवण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
आमच्या प्लॅटफॉर्मवरून हिंसेचे समर्थन करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांचे उदात्तीकरण करण्याची आम्ही अनुमती देत नाही, असे मेटाने म्हटले आहे. या व्यक्ती आणि संघटनांमध्ये अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्यांचा समावेश असल्याचेही मेटाने म्हटले आहे. मेटाच्या या कृतीवर संयुक्त राष्ट्रातील इराणच्या दूतावासाने त्वरित कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.