राजगुरूनगर -खेड तालुक्यात 24 तासांत 44 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या असून बाधित व्यक्तींची संख्या 1535 झाली आहे. आजही तालुक्यात एका व्यक्तीचा करोना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यातील मृतांची संख्या 34 झाली असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यात चाकण परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. चाकण नगर परिषद आणि त्या परिसरातील गावांमध्ये करोनाने फास आवळला आहे. त्यापाठोपाठ राजगुरूनगर आणि आळंदी नगर परिषद हद्दीत करोना बाधित व्यक्तीची संख्या वाढत आहे. खेड तालुक्यात सुमारे 85 गावांमध्ये करोना संसर्ग व्यक्ती सापडल्या आहेत. आज आळंदी नगर परिषदहद्दीत 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा वायसीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. खेड तालुक्यात ग्रामीण भागातील विविध गावात 17, चाकण 11, आळंदी 5 व राजगुरूनगर 1 असे एकूण तालुक्यात 34 मृत्यू करोना विषाणू संसर्गामुळे झाले आहेत.
खेड तालुक्यात मागील 24 तासांत चाकण 7, आळंदी 12, राजगुरूनगर 4अशा तीन नगर परिषदांमिळून 23 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील बुट्टेवाडी 1 भांबुरवाडी 1, तिन्हेवाडी 2, येलवाडी 1, आंबेठाण 3, वराळे 4 मेदनकरवाडी 2, म्हाळुंगे 1, चिंबळी 1, खालूंब्रे 1, मोई 3, कडूस 1 अशा12 गावात एकूण 21 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.
भीमाशंकर देवस्थानने 10 व्हेंटिलेटर द्यावीत
खेड तालुक्यातीळ म्हाळुंगे कोविड केअर सेंटर, चांडोली व तालुक्यातील डीसीएचसीसाठी खेड तालुक्यातील श्री भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून 10 व्हेंटिलेटर उपलब्ध करावित अशी मागणी खेड पंचायत सभापती अंकुश राक्षे यांनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्याकडे केली आहे. खेड तालुक्यात शासकीय व खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे कोविड रुग्णांवर उपचार करताना त्याची कमतरता भासते.