खालापूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कर्जत येथे पार पडलेल्या सभेत खोपोली राष्ट्रवादी आणि आय काँग्रेस, भाजप आणि शेकाप या पक्षाला मोठा धक्का देत दोन माजी नगराध्यक्ष व सहा माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. त्यामुळे खोपोली शहरात शिंदे गटाच्या वर्चस्वात आणखी भर पडली आहे. तर या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप व भाजपला मोठा धक्का बसला आहे.
कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर विश्वास ठेवून खोपोली शहराच्या मागील काळात राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षा म्हणून जनतेतून निवडून आलेल्या सुमन औसरमल व त्याचे पती माजी नगरसेवक मोहन औसरमल, माजी नगरसेवक राजू डूमणे, माजी नगरसेविका लीला डूमणे तर काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष बेबी सॅम्युअल व त्याच्या स्नुषा माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल, शेकापचे माजी नगरसेवक प्रशांत कोठावळे व भाजपाच्या माजी नगरसेविका मानसी मंगेश काळोखे व युवानेते मंगेश काळोखे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार सदा सरवणकर, शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर आदी उपस्थित होते.