Ketaki Chitale – शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी नांदेडच्या रुग्णालयाला (Nanded Govt Hospital) भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटलांनी थेट रुग्णालयाच्या डीनलाच स्वच्छतागृह साफ (Clean Toilet) करायला लावले.
हे प्रकरण हेमंत पाटलांना भोवले असून त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी तक्रार दाखल केली.
दरम्यान, याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. केतकी चितळे ही तिच्या अभिनयापेक्षा इतर कारणांमुळेच जास्त चर्चेत असते.
मग कधी ती सोशल मीडियावर वादग्रस्त विधान करते तर कधी एखाद्या राजकारणी नेत्याशी पंगा घेते. केतकी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते असते.
केतकी चितळे तिच्या पोस्ट काय म्हणाली पाहा…
“आता एका हॉस्पिटल डीनला हॉस्पिटलमधील (Nanded Govt Hospital) संडास साफ करा हे त्याची जात बघून सांगायचे तर! आणि तरीही राव आपल्याकडे खोट्या अॅट्रोसिटी केसेस टाकल्या जात नाहीत.
जय हो अॅट्रोसिटी अॅक्ट 1989 आम्ही सामान्य माणसांवर काय तर आता कुठल्याही पदाला सोडणार नाही..’ अशी पोस्ट केतकी चितळेने केली आहे. याबरोबर तिने युनिफॉर्म क्रिमिनल लॉ आणि वन नेशन वन लॉ असे हॅशटॅग दिले होते.
हेमंत पाटील यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले…
हेमंत पाटील म्हणाले, ‘रुग्णालयात 260 कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत. 36 रुग्ण दगावल्यानंतरही अधिकारी स्वतः चेंबरमधून बाहेर येत नाही आणि यामुळे प्रचंड अनास्था या रुग्णालयात पाहायला मिळत आहे. रुग्णालयातील अनास्थेच्या चिडीपोटी मी हे कृत्य केले आहे.
आणि त्यांनीच नाहीतर मी स्वतः देखील सफाई केलेली आहे. मी अधिष्ठातांना म्हटले की, 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला पंतप्रधान मोदींनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. आपण शौचालय साफ करू. मी स्वत:हा पाणी टाकून शौचालय साफ केलं.
यात अधिष्ठातांना कुठेही आरेतुरे किंवा जातीवाचक शिवीगाळ केली नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारल्याने अॅट्रोसिटी गुन्हा दाखल होत असेल, तर गंभीर बाब आहे.’ असं ते म्हणाले.