नांदेड – येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डाॅ. एस. आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डाॅक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रसुतीनंतर बाळासह आईचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणी बुधवारी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात वाकोडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदेड येथील रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही यात वाढ होत गेली तर मृत्यूची संख्या 31 वर पोहोचली त्यानंतर पुन्हा देखील मृत्यू होण्याच्या घटना सुरुच होत्या. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या रुग्णालयातील मृत्यूच्या घटनांवर होते. त्याच दरम्यान, शनिवारी वैशाली वाघमारे या महिलेला प्रसुतीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रसुती झाली. मात्र काही वेळात बाळाचा मृत्यू झाला तर काही तासांनी वैशाली यांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेचे नातेवाईक कामाजी टोम्पे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, नांदेड येथील डाॅ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूची संख्या 41 झाली आहे. रुग्णालयात पुरेसा औषध साठा आणि कर्मचारी वर्ग उपस्थित नसल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सखोल माहितीकरता समिती स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान, त्याआधीच अधिष्ठांतावर कारवाई करण्यात आली. या सर्व प्रकरणावरून राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे.
नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनवर दाखल झालेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रकार आहे… डीन यांचा हलगर्जीपणा असेल तर कारवाई झाली पाहीजे पण पुरेसा औषध पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याबद्दल संबंधित विभागाचे मंत्री आणि सरकार यांच्यावर कोण आणि काय…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 5, 2023
रोहित पवार यांचे ट्विट –
“नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनवर दाखल झालेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रकार आहे… डीन यांचा हलगर्जीपणा असेल तर कारवाई झाली पाहीजे पण पुरेसा औषध पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याबद्दल संबंधित विभागाचे मंत्री आणि सरकार यांच्यावर कोण आणि काय कारवाई करणार? केवळ डीन वर गुन्हा दाखल करून सरकारला आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता येणार नाही!”
संबंधित घटना –
दरम्यान, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटलांनी थेट रुग्णालयाचे डीन डाॅ. वाकोडे यांना स्वच्छतागृह साफ करायला लावले. या प्रकरणानंतर डीन डाॅ. एस.आर. वाकोडे यांच्या तक्रारीवरून हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमंत पाटील यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. पाटील म्हणाले, रुग्णालयात 260 कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत. 36 रुग्ण दगावल्यानंतरही अधिकारी स्वतः चेंबरमधून बाहेर येत नाही आणि यामुळे प्रचंड अनास्था या रुग्णालयात पाहायला मिळत आहे. रुग्णालयातील अनास्थेच्या चिडीपोटी मी हे कृत्य केले आहे आणि त्यांनीच नाहीतर मी स्वतः देखील सफाई केलेली आहे. मी अधिष्ठातांना म्हटले की, 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला पंतप्रधान मोदींनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. आपण शौचालय साफ करू. मी स्वत:हा पाणी टाकून शौचालय साफ केलं.
यात अधिष्ठातांना कुठेही आरेतुरे किंवा जातीवाचक शिवीगाळ केली नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारल्याने अॅट्रोसिटी गुन्हा दाखल होत असेल, तर गंभीर बाब आहे. मृत्यूंवर कोणतीही चर्चा होत नाही. कुठलीही संघटना आंदोलन करत नाही, अशी खंत हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.
रात्री ३ वाजता गुन्हा दाखल होत, असेल तर या प्रकरणात शंभर टक्के राजकारण आहे. मी शिवीगाळ केली किंवा जातीवाचक बोललो तर नक्की गुन्हा दाखल करा. पण, जातीवाचक बोललो नसताना अॅट्रोसिटी दाखल होणे चुकीचे आहे, असेही हेमंत पाटील यांनी म्हटले आहे.