पलक्कड (केरळ) – केरळातील पलक्कड गावात शनिवारी दुपारी एका टोळीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची तीक्ष्ण शस्त्रांनी वार करून हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. श्रीनिवासन (वय 45) असे या हल्ल्यात ठार झालेल्या संघ कार्यकर्त्याचे नाव आहे. त्यांच्यावर पलक्कड शहराच्या मध्यभागी असलेल्या त्यांच्या दुकानातच हल्लेखोरांच्या एका गटाने हल्ला केला.
संशयित मोटारसायकलवरून घटनास्थळी आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या श्रीनिवासन यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आले. येथील जवळच्या एका गावात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या नेत्याची हत्या झाल्याच्या 24 तासांनंतर ही घटना घडली आहे.
शुक्रवारी दुपारी मशिदीमध्ये नमाज अदा करून घरी परतत असताना जिल्ह्यातील एलप्पुल्ली येथे 43 वर्षीय सुबैर यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच ही हत्या झाली, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.