अमित शहांच्या आक्षेपांना केजरीवालांचे पाईन्ट टू पॉईन्ट उत्तर

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसे आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातील वाकयुद्ध चांगलेच रंगु लागले आहे. मोफत वायफाय आणि शाळांमध्ये सीसीटीव्ही लागू करण्याच्या संबंधात केजरीवालांनी जे आश्‍वासन दिले होते त्याची कोठेच पुर्तता झालेली नाही अशी टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली होती. त्याला केजरीवालांना आज मुद्देसुद उत्तरे दिले आहे.

दिल्लीत मोफत वायफाय सेवा दिली जात असल्याचे केजरीवालांनी म्हटले होते पण भाजप अध्यक्ष अमित शहा यांना कोठेच हे मोफत वायफाय मिळाले नाही. ही सेवा शोधताना अमित शहा यांच्या मोबाईलची बॅटरीही संपुन गेली अशी टीका गुरूवारी रात्री भाजपच्या एका नेत्याने ट्विटरवर केली होती. त्याला उत्तर देताना केजरीवाल यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की, आम्ही दिल्लीत केवळ फ्री वायफाय सेवाच सुरू केलेली नाही तर काही ठिकाणी आम्ही मोफत मोबाईल बॅटरी चार्जर सेवा केंद्रेही सुरू केली आहेत. एवढेच नव्हे तर दिल्लीचे रहिवासी या नात्याने अमित शहा यांनी विजेचे बिलही भरण्याची गरज नाही कारण आम्हीं दिल्लीकरांना दोनशे युनिट वीज मोफत पुरवत आहोत.

दिल्लीतील 1041 सरकारी शाळांमध्ये 1.2 लाख सीसीटीव्ही बसवण्याचे आश्‍वासन केजरीवालांनी दिले होते पण केवळ काहीं ठिकाणीच हे कॅमेरे बसवून केजरीवालांनी सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याचा दावा केला आहे असा आरोपही अमित शहांनी केला होता. त्याला उत्तर देताना केजरीवालांनी म्हटले आहे की केवळ काही ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत हे अमित शहांनी मान्य केले ते चांगले झाले. निदान काही ठिकाणी तरी त्यांना आम्ही केलेले काम दिसले आहे. काही दिवसांपुर्वी अमित शहा म्हणाले होते की दिल्लीत एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला नाही, पण आता त्यांना काहीं ठिकाणी हे कॅमेरे दिसले आहेत याचा मला आनंद झाला आहे. शाळांमधील सीसीटीव्ही कॅमरे हा विषय उपस्थित करून भाजप मते मागत आहे याचाच अर्थ आम्ही दिल्लीतील प्रचाराचाही रोख बदलला आहे असे केजरीवालांनी म्हटले आहे. फ्री वायफाय आणि सीसीटीव्ही हे प्रचाराचे विषय झाले आहेत हे आमचे यश आहे असेही केजरीवालांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here