नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejariwal) यांनी आज राज्य सरकारच्या जवळपास 80,000 कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी 7000 रुपयांचा बोनस (Diwali Bonus) जाहीर केला आहे. त्यावर राज्य सरकारचे 56 कोटी रूपये खर्च होणार आहेत.
एका व्हिडिओ संदेशात केजरीवाल यांनी आजच हा बोनस सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे म्हटले आहे. केजरीवाल म्हणाले की, दिल्ली सरकारने (Delhi Sarkar) गेल्या आठ वर्षांत शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांमध्ये “बरेच काम” केले आहे. (Arvind Kejariwal)
यामध्ये, आमच्या कर्मचाऱ्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे, त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच, आम्ही दिल्लीला स्वप्नांच्या शहरात बदलू शकलो. यापूर्वी, 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्ली महानगरपालिकेतील अनेक कामगारांच्या नोकऱ्या नियमित करण्याची घोषणा केली होती. त्यात 6494 सफाई कामगारांना नोकरीत कायम केले गेले आहे.
पंजाबात आमचे सरकार सत्तेवर आल्यापासून आम्ही तेथे 30 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम केले आहे आणि त्यांना रितसर नियमानुसार वेतनश्रेणी लागू केली असल्याची माहितीही केजरीवालांनी दिली आहे.