नारायणगाव – जमावबंदीचा आदेश असताना शोरूम सुरू ठेवल्याप्रकरणी वारूळवाडी (नारायणगाव) येथील कोठारी व्हिल्स या शोरूमचे व्हाइस चेअरमन व सहव्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अर्जुन घोडे यांनी दिली.
कोठारी व्हिल्सचे व्हाइस चेअरमन प्रवीण दिवेकर (रा. पुणे) आणि सहव्यवस्थापक नरेंद्र शरदचंद्र करंदीकर (वय 55, रा. वारूळवाडी), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल दिनेश दत्तात्रय साबळे यांनी दिली.
वारूळवाडी (नारायणगाव) हद्दीतील कोठारी व्हिल्स हे शोरूम प्रवीण दिवेकर आणि नरेंद्र शरदचंद्र करंदीकर यांच्या परवानगीने आज (दि. 20) सकाळी साडेदहा वाजता सुरू ठेवून त्यामध्ये लोकांची गर्दी जमवून तसेच आपले कामगार एकत्र जमवून गाड्यांची विक्री व दुरुस्ती करीत असताना मिळून आले. दोघांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयीन आदेशाचा अवमान केला म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.