पुणे, (प्रभात वृत्तसेवा) – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेंतर्गत डीबीटी तत्त्वाद्वारे लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यासाठी एकाच बँकेची सेवा घेण्यात येणार आहे. या योजनेसाठी नव्याने खाते उघडवायचे असल्यास बँकेकडून झीरो बॅलन्सने खाते उघडण्याची सेवा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या शून्य ते १८ वयोगटातील मुलांमुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्याचे संगोपन व विकास घडवून आणण्याच्या मुख्य उद्देशाने क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना सुरू करण्यात आली आहे.
सदर योजना ही संस्थाबाह्य योजना असून, या योजनेअंतर्गत शून्य ते १८ वयोगटांतील मुलामुलींना थेट पर्यायी कुटुंबात संगोपनाकरिता ठेवता येते. अनाथ, निराधार, निराश्रित, बेघर, दुर्धर आजारी पालकांची मुले, कैद्यांची मुले या योजनेचा लाभ घेतात. क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सुधारीत मार्गदर्शक सूचना काढण्यात आलेल्या आहेत.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या परिपोषण अनुदानात वाढ करण्यात आली असून, एक पालक आणि दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थीनिहाय व संस्थानिहाय निधी वितरणासाठी डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात व संस्थेच्या खात्यात थेट लाभ वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत डीबीटी तत्त्वावर वितरीत होणाऱ्या निधीमध्ये एकात्मिकता येण्यासाठी अनुदान वितरणाची कार्यवाही एकाच बँकेकडून करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. त्यास महिला व बाल कल्याण विकास विभागाची मान्यता मिळालेली आहे.
बालसंगोपन योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र लाभार्थी व सस्थांचे अनुदान वितरीत करण्यासाठी महिला व बाल विकास आयुक्तालयाचे आयुक्त यांच्या नावाने नोडल अकाउंट उघडण्यात यावे. राज्य शासनाकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेंतर्गत वितरीत करण्यात येणारे अनुदान या खात्यामध्ये वर्ग करण्यात करण्यात येईल व या खात्यातून सर्व लाभार्थ्यांना, स्वयंसेवी संस्थांना ते वितरीत करण्यात येणार आहे.