स्मरण- कस्तुरबा गांधी : अलौकिक व्यक्‍तिमत्त्व

अमेय गुप्ते

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. महात्मा गांधी यांच्या जडणघडणीत प्रथम त्यांच्या मातोश्री कै. पुतळीबाई यांचा तर सहचारिणी कै. कस्तुरबा यांचा वाटा फार मोलाचा आहे. एकीने त्यांना जन्म देऊन उत्तम संस्कारांची शिदोरी दिली, तर दुसरीने त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील भरीव कार्यास आपला संसार सांभाळून भक्कम साथ दिली.

कस्तुरबा या पोरबंदर येथील महापौर व व्यापारी गोकुळदास कपाडिया यांच्या कन्या होत्या. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1869 रोजी झाला. व्रजकुवरबा या त्यांच्या मातोश्री. गांधीजी यांच्यापेक्षा कस्तुरबा 5 महिन्यांनी वयाने मोठ्या होत्या. सन 1882 मध्ये त्यांचा व गांधीजी यांचा विवाह झाला. कस्तुरबा गोकुळदास कपाडिया या सौ. कस्तुरबा मोहनदास गांधी झाल्या. त्या शांत, साध्या, विचारी व व्यवहारचातुर्य असणाऱ्या होत्या. त्यामुळे गांधीजींना न विचारता आपले निर्णय स्वत:च घेत असत. आपली धर्मपत्नी आपल्याला वचकून राहणारी गरीब गाय नाही हे गांधीजींनी ओळखलं.

सन 1888 मध्ये कस्तुरबांच्या संसारवेलीवर अंकुर उमलण्याची चाहूल लागली व 23 ऑगस्ट 1888 रोजी त्यांचा पहिला मुलगा हरीलाल जन्माला आला. या नंतर मणिलाल (28 ऑक्‍टोबर 1892), रामदास (2 जानेवारी 1897), देवदास (22 मे 1900) अशी चार अपत्ये झाली. त्या गांधीजींसह दक्षिण आफ्रिकेत गेल्या असता त्यांनी समाजसेवेचे व्रत अंगीकारले. दुपारी घरातील सर्व कामे आटोपल्यावर त्या भारतीय मजुरांच्या वस्तीत जात व तेथील स्त्रियांशी संवाद साधून स्वच्छता व प्लेग याबाबत सर्वांना प्रबोधन करीत असत. तेथील एका रिकाम्या गोदामात त्यांनी मजुरांसाठी तात्पुरते रुग्णालय काढून आरोग्य सेवेला सुरुवात केली. यासाठी तेथील लोकांकडून स्वतः प्रत्येक घरी जाऊन गाद्या, उश्‍या, चादरी, लोटी, भांडे अशा वस्तू त्यांनी गोळा केल्या.

समाजसेवेचा हा वसा त्यांनी जणू गांधीजींकडून घेतला होता. जशा बां गांधीजी यांच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या तशा आचरणानेही मोठ्या होत्या. एक धर्मपत्नी व माता म्हणून त्यांचे वागणे विवेकाचे व संयमाचे होते. त्या बापूंच्या मागे सावलीसारख्या वावरत होत्या. बां म्हणजे जणू शांततेची मूर्ती. अगदी त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांचा अल्प का होईना सहभाग होता. दक्षिण आफ्रिकेत असतानाची एक आठवण म्हणजे, गांधीजी तेथील मेमण पेढीचे काम पाहत असत, त्यामुळे अनेकजण कामानिमित्त त्यांच्याकडे येत व काहीवेळा रात्री मुक्काम करीत असत. त्यांच्या खोलीत मोरी नसल्याने लघुशंका एका भांड्यात करावी लागे.

एकदा पंचम जातीचा ख्रिश्‍चन तेथे कामासाठी आला असता तो रात्री मुक्‍कामी राहिला, पण तो ते लघुशंकेचे भांडे साफ न करता गेला. गांधीजी ते भांडे साफ करणार तोच बां पुढे आल्या, त्यांनी ते भांडे साफ करून रागाने ठेवले. तेव्हा गांधीजी म्हणाले, प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. माझ्या घरात अशी आदळ-आपट चालणार नाही, तेव्हा बां रागावलेल्या असता गांधीजींना म्हणाल्या, तुमचे घर तुम्हाला लख लाभो. हे ऐकताच गांधीजींनी त्यांना दंड धरून घराबाहेर ढकलले! पण पतिव्रता बां पुन्हा घरात आल्या व गांधीजींना म्हणाल्या, लावून घ्या दार, जगाला शोभा नको व्हायला
बॅरिस्टरबाबूंची ! इथे कोण आहे माझं ? आई की बाप ? तर मी बाहेर जाऊ ? तो कटू अनुभव घेत बा पुन्हा आल्या गेलेल्या पाहुण्यांची सेवा करण्यात मग्न झाल्या. सन 1913 मध्ये भारतीय मजुरांच्या शोषणाविरुद्ध सुरू केलेल्या चळवळीत त्यांनी 3 महिने कारावास भोगला. त्यानंतर गांधीजींच्या तुरुंगवासाच्या काळात कस्तुरबांनी चळवळीचे कार्य चालवले. 23 सप्टेंबर 1913 रोजी 16 भारतीय लोकांना अटक करून घेण्यासाठी ट्रान्सवालच्या सीमेकडे जाणारी ट्रेन पकडली. यात 12 पुरुष व 4 महिला होत्या.

कस्तुरबा गांधी त्यांचे नेतृत्व करीत होत्या. सीमेवर पोहोचल्यावर त्यांनी ओळखपत्र दाखवण्यास नकार दिला. सर्वांना अटक झाली व न्यायालयाने 3 महिन्यांची सक्‍त मजुरीची शिक्षा सुनावली. त्यांना मार्टिस बर्ग तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगातील कठोर चाकोरीला सज्ज होण्यास कस्तुरबांनी सर्व महिलांना तयार केले. सन 1915 मध्ये गांधीजींनी चंपारण्यात नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहात कस्तुरबाही सहभागी झाल्या होत्या. त्यांनी शेतकऱ्यांच्या बायका व मुलांना साक्षरता व स्वच्छता याचे धडे दिले. कस्तुरबांना अनेक वर्षांपासून दम्याचा आजार होता. तो पुन्हा काही वर्षांनी वाढला. सन 1942च्या “चलेजाव’ आंदोलनाच्या वेळी गांधीजींनी राष्ट्राला उद्देशून “करा किंवा मरा’ असा संदेश गोवालिया टॅंक मैदानावर दिला. यामुळे त्यांना अटक झाली व ते बिर्ला हाऊस येथे गेले. त्या दिवशी सायंकाळी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार होती. पण गांधीजींना अटक झाल्यामुळे ते बिर्ला हाऊसला होते. या सभेस कस्तुरबा गेल्या व एक लाख जनसमुदायाला उद्देशून त्यांनी भाषण केले.

आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, भारतीय स्त्रियांनी स्वातंत्रलढ्यात सहभागी व्हावे. पोलिसांनी कस्तुरबा व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करून आर्थर रोड तुरुंगात ठेवले. या आंदोलनाच्या अतिश्रमामुळे त्यांची प्रकृती बिघडली. तसेच त्यांना पूर्वी दोनदा हृदयविकाराचे झटके आले होते. या सुमारास गांधीजी व कस्तुरबा यांना पुणे येथील आगाखान पॅलेस येथे बंदिवासात ठेवले होते. 22 फेब्रुवारी 1944चा महाशिवरात्रीचा तो दिवस, त्या दिवशी वयाच्या 74 व्या वर्षी कस्तुरबांनी जगाचा निरोप घेतला. बा-बापूंच्या 62 वर्षांच्या सहजीवनाचा अंत झाला. गांधीजींना दु:ख झालं. इंग्रज सरकारने आगाखान पॅलेसमधील एका बाजूला कस्तुरबांच्या अंत्यसंस्काराची परवानगी दिली.

गांधीजी बांबद्दल म्हणत, जर पुन्हा मला पत्नी निवडायचा प्रसंग आलाच तर मी जन्मोजन्मी कस्तुरबांची निवड करीन, कस्तुरबा एक बहादूर स्त्री होती, तिच्या संगतीने मला शोभा आली. कस्तुरबा खरंच पतिव्रता होत्या. त्याची एक आठवण म्हणजे, त्यांच्या निधनसमयी त्यांच्या हातात स्वदेशी बनावटीच्या हिरव्या बांगड्या होत्या. पण आश्‍चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांच्या अस्थी गोळा करताना त्यांच्या हातातील त्या बांगड्या तशाच होत्या. एकही बांगडी फुटली किंवा वितळली नव्हती! अशा या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विरांगनेस जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.