तुमचे मत शहिदांना समर्पित करा! – मोदींकडून आचारसंहितेचे उल्लंघन 

– राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रिय आयोगाला अहवाल पाठवला 

मुुंबई – देशात प्रथम मतदान करणाऱ्या तरूणांनी आपले पहिले मतदान शहिद जवानांना समर्पित करा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाची केंद्रिय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मोदींच्या भाषणाचा अहवाल दिल्लीला निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. त्यामुळे शहिद जवानांच्या नावाचा वापर केल्याप्रकरणी मोदी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी केंद्रिय निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे आखली आहेत. यामध्ये शहिद जवांनाच्या नावाचा आणि त्यांच्या छायाचित्रांचा वापर करून मत मागू नये, असा उल्लेख करण्यात आला असताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लातूर जिल्ह्यातील औसा येथे भाजप उमेदवारासाठी घेतलेल्या प्रचारसभेत या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी आपले मत पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांना अर्पण करावे, असे आवाहन केले होते. या आवाहनावर विरोधी पक्ष कॉंग्रेसने आक्षेप घेतला होता. मोदींचे हे आवाहन म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

विरोधी पक्षाच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मोदींच्या विधानाची दखल घेत याप्रकरणी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे अहवाल मागितला. हा अहवाल आयोगाला सादर करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली. यापार्श्‍वभूमीवर मोदींच्या विरोधातील तक्रारीबाबत आयोग काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.