अहमदनगर – करूणा धनंजय मुंडे यांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे. ‘शिवशक्ती सेना’ असे पक्षाचे नाव असेल अशी माहिती करूणा मुंडे यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. करूणा मुंडे म्हणाल्या, ‘एक वर्षांपासून मी जीवन ज्योती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केलेले आहे. मात्र अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार दिसून येत आहे. या काळात अनेकांनी सांगितले की स्वतःचा राजकीय पक्ष काढा. अनेक पक्षांनी मला आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रणही दिले, मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापित करण्याचा निर्णय घेतला असून या पक्षाचे नाव ‘शिवशक्ती सेना’ असेल.’
तसेच आपण हा पक्ष जनतेकडून देणगी गोळा करून सुरू करणार असून या पक्षात समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थान असेल, गरज पडली तर मी स्वतः परळी मधून धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवेल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. आज समाजकारण करताना मला पॉवर मध्ये असणे गरजेचे वाटले त्यामुळे मी स्वतःचा पक्ष स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही करूणा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पत्नींना गप्प केलं आहे. आघाडी सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्यांच्या पत्नीने माझ्या पक्षात येण्यास सहमती दाखवली आहे, योग्य वेळी मी ते नाव जाहीर करेल असा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला. तसेच राज्यातील समाजसेवा करणाऱ्यांना त्यांच्या पक्षात येण्याचे आवाहनही करूणा मुंडे यांनी केले आहे.