नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने फ्रान्स आणि ब्रिटनच्या प्रवासाची अनुमती दिली. कार्ती चिदंबरम यांच्यावर एअरसेल-मॅक्सिस आणि आयएनएक्स मीडिया गैरव्यवहाराचा आरोप आहे. त्यांना दिनांक 15 ते 27 सप्टेंबरदरम्यान परदेश प्रवास करण्यास दिल्ली न्यायालयाने अनुमती दिली.
कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात चार प्रकरणी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाकडून तपास केला जातो आहे. विदेश प्रवासासाठी देण्यात आलेली ही अनुमती या प्रकरणांच्या तपासाच्या आड येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
फ्रान्समधील सेंट ट्रोपेझ येथे दिनांक 15 ते 24 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेसाठी आपल्याला निमंत्रित करण्यात आले आहे.
तसेच तेथूनच आपल्याला ब्रिटनमध्ये कामानिमित्त राहात असलेल्या कन्येची भेट घेण्यासाठीदेखील जायचे आहे, असे कार्ती चिदंबरम यांनी न्यायालयाकडे केलेल्या अर्जामध्ये म्हटले होते.