भोर -भोर तालुका करोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच आज (दि. 27) आंबवडे खोऱ्यातील एका 47 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, करोना भोरची पाठ सोडेना, असे म्हणण्याची वेळ भोरवर आली आहे.
भोर शहरात शुक्रवारी (दि. 26) करोनाबाधित आढळलेल्या दोन रुग्णांचे आहवाल निगेटिव्ह आल्याने तालुका करोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच नाझरे येथे तीन करोना संशयित रुग्ण आढळून आले होते. तालुका प्रशासनाने या तीन जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले होते.
त्यातील एका 47 वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर एकाचा निगेटिव्ह आला असून, एकाचा आहवाल फेरतपासणी साठी पाठवला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे आणि भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली.
या रुग्णांच्या संसर्गात आलेल्या 17-18 जणांना भोर येथील कोव्हिड केंद्रात क्वारंटाइन केले असून, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले असल्याचे डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.
दरम्यान भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी नाझरे (ता. भोर) कंटेन्मेन्ट झोन जाहीर केला असून, तीन किमीपर्यंत बफर झोन घोषित केला आहे. गावात पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती तहसीलदार अजित पाटील यांनी दिली.